सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

रु. ७५,०००/- खर्चाच्या मर्यादेत छोटेखानी कार्यक्रम

जनमानसात शासनाची प्रतिमा उंचाविण्यासाठी विविध प्रकारच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. असे कार्यक्रम सन २०१३-१४ या वर्षापासून आयोजित करण्यात येतात.

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला त्या आर्थिक वर्षात कोणते कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्याबाबतचा आराखडा करुन त्यास शासनाची मान्यता घेण्यात येते. या कार्यक्रमामध्ये शास्त्रीय गायन, मान्यवरांची शताब्दी, पुण्यतिथी कार्यक्रम, स्वरालयासारखे कार्यक्रम, लोकरंग, वादन, नृत्य, भक्तीरंग, नाट्यरंग, साहित्यरंग, विविध कलांगण इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असतो.

सदर कार्यक्रम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याबाबत शासन निर्णयात नमुद आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या स्तरावर प्रत्येक आर्थिक वर्षात एका महिन्यात २ किंवा एकूण वर्षभरात कमाल २० छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच प्रत्येक कार्यक्रमात जास्तीत जास्त रुपये ७५,०००/- या प्रमाणे रुपये १५,००,०००/- (रु.पंधरा लाख मात्र) इतका निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सव

राज्य शासनाच्या वतीने ५ दिवसाचा राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सव आयोजित करण्यात येतो. मागील वर्षी दि. २१ ते २५ मार्च २०१७ या कालावधीत वाशी, नवी मुंबई येथे सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी नवी मुंबई येथे या ढोलकीफड महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.

नवी मुंबई येथेच हा महोत्सव घेण्यामागचे कारण असे आहे की, नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार वर्ग हा महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हातील ग्रामीण भागातून आलेला आहे. तमाशा महोत्सव पाहण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग मोठया प्रमाणात येत असतो. या महोत्सवात कला सादर करण्यासाठी श्री. रघुवीर खेडकर यांच्यामार्फत फडांची निवड करण्यात येते. श्री. रघुवीर खेडकर हे तमाशा कलावंतांच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या मार्फत सदर फडांची निवड करण्यात येत असते.

खडी गंमत महोत्सव

खडी गंमत हे विदर्भातील पुरातन लोकनाट्य आहे. विदर्भात खडी गंमत आजही लोकप्रिय असून रात्रभर प्रेक्षक या मनोरंजनाचा आस्वाद लुटत असतात. या कलाप्रकारात कलावंत नाट्याबरोबरच समाजप्रबोधनही करत असतात. आधुनिक युगात या लोप पावत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रतिवर्षी खडी गंमत महोत्सव आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.

गतवर्षी दि.१८ ते २४ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत रेंगेपार (कोहळी), ता. लाखनी, जि. भंडारा येथे आयोजित करण्यात आला. त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला. यावर्षी सात दिवसांचा खडी गंमत महोत्सव माहे जानेवारी २०१८ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे.

राज्य लावणी महोत्सव

लावणी कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी विधिमंडळाच्या अधिवेशन काळात ३ दिवशीय राज्य लावणी महोत्सवाचे आयोजन एनसीपीए, नरीमन पॉईंट, मुंबई येथे करण्यात येते. लावणी महोत्सवात प्रतिदिनी ३ कलापथक प्रमाणे ३ दिवसासाठी ९ कलापथकांचे सादरीकरण करण्यात येत असते. सदरच्या लावणी महोत्सवाचे आयोजन सन २००६ पासून सुरु करण्यात आले आहे.

लावणी महोत्सवामध्ये कला सादर करणाऱ्या कलापथकाची निवड ही लोककलावंत अनुदान पॅकेज संगितबारीच्या समिति सदस्यांकडून महाराष्ट्रातील संगितबारीच्या विविध केंद्रावर भेट देऊन तेथील कलापथकांची प्रत्यक्ष चाचणी पाहून निवड करण्यात येते.

सदरहू समितीमध्ये खालीलप्रमाणे सदस्य आहेत-

1) बाळासाहेब काळे
2) श्री. फुलचंद अंधारे
3) श्रीमती छाया खुटेगावंकर
4) श्रीमती रेश्मा परितेकर

दशावतारी नाट्य महोत्सव

कोकणातील पारंपरिक दशावतारी नाट्यकलेला उत्तेजन व संवर्धनासाठी शासनातर्फे सात दिवसांचा दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात सात उत्तमोत्तम दशावतारी पथकांना सहभागी करण्यात येते गतवर्षीचा दशावतारी महोत्सव भांडूप, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.