सांस्कृतिक कार्य संचालनालय

(०२२) २२८४ २६३४

      |  टेक्स्ट साईझ   

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा

उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा, समृद्ध सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे, हा उद्देश ठेऊन महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन गेली ५६ वर्ष करीत आहे. या वर्षी ५७व्या वर्षात राज्य नाट्य स्पर्धा पोहचली आहे.

दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये वर्तमानपत्रात बातमी / वृत्त देऊन सर्व स्पर्धक संस्थांना स्पर्धेबाबत अवगत करण्यात येते. बातमीवृत्तांतात प्रवेशिका कार्यालयाकडून घेऊन जाण्याचा कालावधी तसेच सादर करावयाचा कालावधी नमूद केलेला असतो. गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या संकेतस्थळावर प्रवेशिका, नाट्य नियमावली व बातमी वृत्तांत देण्यात येतो. संस्थेस संपूर्ण भरलेली व सर्व कागदपत्रांसह प्रवेशिका सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली जाते. त्यानंतर स्पर्धक संस्थेचा कार्यक्रम तयार करण्यात येतो. स्पर्धक संस्थांना तारखांचे वाटप ए ते झेड किंवा झेड ते ए या इंग्रजी अद्याक्षरांप्रमाणे करण्यात येते. अंतिम नाट्य स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर त्या त्या जिल्हाच्या स्थानिक समन्वयकामार्फत आयोजन करण्यात येते.

बक्षिसांच्या रकमेत सन २०१७ पासून भरघोस वाढ करण्यात आली आहे. अंतिम हौशी नाट्य स्पर्धेत प्रथम बक्षिस रु.६ लाख, द्वितीय रु.४ लाख, तृतीय रु.३ लाख अशी बक्षिसे तसेच रौप्य पदके, प्रशस्तीपत्रके आणि रोख रक्कम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिली जातात. राज्यातील एकूण 19 केंद्रांवर तसेच दिल्ली व गोवा या केद्रांसह माहे नोव्हेंबर पासून स्पर्धेचा शुभारंभ होत असतो. या स्पर्धेबरोबर हिंदी, संगीत, संस्कृत या स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. मुंबई व जिल्हास्तरीय 19 स्पर्धा केंद्रांवर एकूण 8000 इतके कलावंत एकाच स्पर्धेत रंगमंचीय सादरीकरणासाठी झटत असतात.

महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा

व्यावसायिक रंगभुमीच्या कलेला उत्तेजन देण्याच्या हेतूने १९८६-८७ पासून व्यावसायिक नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यास दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने अलिकडेच या स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत भरघोस वाढ केली असून तपशिल खालीलप्रमाणे आहे.
प्रथम पारितोषिक   रु.७.५० लाख
द्वितीय पारितोषिक   रु.५.५० लाख
तृतीय पारितोषिक   रु.३.५० लाख

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा

महाराष्ट्रातील रंगभूमीस उत्तम रंगकर्मीची कमतरता भासू नये आणि लहान वयाच्या कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावी काळात त्यांच्यामधुन उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने मराठी बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा पाच महसूल विभागात प्राथमिक फेरीत स्वरुपात आयोजित करण्यात येतात. प्राथमिक फेरीतील निवडक नाटकांची अंतिम फेरी आयोजित करण्यात येते.